महती संसारवृक्षाची, गरज काळाची

महती संसारवृक्षाची, गरज काळाची
                                                                                                                                        शुभम केणेकर
                                                                                                                                                        भारत देशाचा कार्यकर्ता
 
                भारतीय संस्कृती मध्ये वडाच्या झाडाचे असाधारण महत्व विशद केले आहे . आपण सर्वांना परिचित असलेली सत्यवान - सावित्री ची कथा ह्या वडाच्या झाडाशी इतकी निगडित आहे कि वटपौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने आपल्या पतीराजांचे दीर्घायुष्य वडाच्या झाडाचे पूजन करून मागतात .
                पुराणकाळातील  बुद्धिमानसावित्री वटवृक्षाचे महात्म्य जाणत होती, म्हणूनच तिने मृर्च्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले, कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळ जवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. तिला माहीत होते, की तिच्या मृतवत पतीला त्यावेळेस प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती! आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. आणि म्हणूनच , आपोआप त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सहजपणे शुद्ध प्राणवायू मिळत असतो
एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे.
                वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. पुराण कथेनुसार , वडाचे झाड हे शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे आणि वडाच्या पारंब्या ह्या शिवाच्या जटा आहेत . प्रज्ञापुरीचे श्री स्वामी समर्थ ह्याच झाडाखाली बसत . वडाचे झाड हे दत्तगुरूंचे मूळ मानले गेले आहे . म्हणूनच , स्वामी आजोबा अनेकदा ," वडाचे झाड - मूळ पुरुष " असे झाडाला उद्देशत असत.
                त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात.
      वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतोवृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात.तसेच ,फुलोरे गोलाकार, काहीसे पोकळ असे असतात .मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळे त्‍यात असणाऱ्या कीटकांमुळे माणसांना खाण्यास योग्य नसतात.
                आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.
१.      झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात.
२.      वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे.
३.      पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.
४.      या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो.
५.      विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे.
६.      कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात.
७.      ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह काम होतो
८.      पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदुळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात.
९.      वडाचे पान - अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इ. विकारांवर औषध म्हणून उपयोगी पडते. तोंड आले असता याच्या काढ्याने गुळळ्या कराव्या. गर्भ टिकून रहाण्यासाठी तसेच इच्छित संतती साठी वडाच्या कोंबाचा उपयोग होतो. 
  उन्ह्याळ्यात या वृक्षामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. अशाप्रकारे , अनन्य साधारण महत्व असलेले हे झाड ! ज्याच्या घराजवळ असेल , तो आजकालच्या प्रदूषणाच्या जगातही प्राणवायूने श्रीमंतच म्हणावा लागेल .
वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष.  त्याला फुटणार्‍या पारंब्या जमिनीच्या खोल भागात जातात आणि त्याला मुळे फुटून पुन्हा वटवृक्ष तयार होतो. त्याचा रुंद खोड आणि विस्तारीत फांद्यामुळे होणारा भव्य विस्तार, डौलदारपणा, दाट पानांमुळे मिळणारी दाट सावली यामुळे पूर्वीच्या काळी हा वृक्ष वाटसरूचे आश्रयस्थान असे. म्हणूनच याला आधारवडही संबोधले जाते. फार पूर्वी आणि आजही खेडय़ातून बैलगाडीने किंवा पायी प्रवास करणारे शेकडो पांथस्थ या वटवृक्षाखाली निद्राधीन होऊन विश्रांती घेतात. हिंदी मध्ये व्यापारी लोकांना बनियाअसे म्हणतात. ब्रिटीश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पाहिले की हे बनियालोक व्यापाराच्या वेळी प्रवास करताना ह्या झाडाच्या विशाल सावलीत बसून चर्चा करतात , मिंटीग घेतात आणि म्हणून त्यांनी ह्या झाडाला बनिया वरून बॅनियन ट्री - ( Banyan Tree) असे नाव ठेवले.
गयेचा अक्षयवट व प्रयागचा श्यामवट ( प्रयागच्या अक्षय वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते अशी वंदता आहे)  फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. सिबपूर (कोलकाता) येथील भारतीय वनस्पती उद्यानातील वटवृक्ष पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनला आहे. जावळी (जिल्हा सातारा) व जुन्नर (जिल्हा पुणे) येथेही प्राचीन व प्रचंड वटवृक्ष आहेत. मद्रास येथील अड्यार नदीच्या दक्षिण तिरावर पाचशे वर्षे आयुःकाल असलेला वृक्ष असून त्याने सुमारे ४,००० चौ. मी. एवढे क्षेत्र व्यापले आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी ६७.५ मीटर व पूर्व−पश्चिम लांबी ६१.५ मीटर आहे. त्या वृक्षाखाली तीन हजार माणसांची परिषद भरली होती, अशी नोंद आहे.
अशा ह्या डेरेदार , सदापर्णी , हिरव्यागार वडाच्या झाडाचा पक्ष्यांना मोह नाही झाला तरच नवल . वडाच्या झाडाच्या ढोलीत अनेक पक्षी आपली घरटी बांधतात. बारीक बारीक फळे हे त्या पक्ष्यांचे अन्न आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व या झाडावरच अवलंबून आहे. त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणार्‍या बियांमुळे परागीभवनाचे 'ज्येष्ठ' काम होते. झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रूजून पर्यावरण संवर्धनास पक्ष्यांची मदत होते. परिसरात वडाच्या झाडाचे अस्तित्व असणे हे त्या परिसराचा पर्यावरण समतोल असल्याचे द्योतक आहे. वडाच्या पारंब्या जमिनीत रूजून नवीन झाड तयार होते. त्यामुळे दाट झाडी तयार होऊन त्याखाली लहान वनस्पती वाढू शकतात. कमी ऊन मिळणार्‍या भागात या प्रकारच्या वनस्पती वाढतात. वेलींना आधार मिळतो. खाली पडलेल्या, कुजलेल्या पालापाचोळ्यापासून नैसर्गिक, जैविक खत मिळते. वडाची मुळे खूप खोलवर पसरलेली असतात. त्यांची माती धरून ठेवण्याची क्षमताही चांगली असते. त्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते.
वडाचे झाड जंगलात असणे हे त्या जंगलाच्या संपन्नतेचे लक्षण आहे. त्यामुळेच आपल्याकडच्या कितीतरी देवरायांमध्ये वडाच्या झाडाचे प्रमाण लक्षणीय आहे. एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यास मदत करणे हेदेखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो.
आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. आर्यांना हा वृक्ष प्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये याचा न्यग्रोधनावाने उल्लेख आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश इ. अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भात वडाचा निर्देश आहे.
सावलीच्या वरून आठवले की बातम्यांमधून आपण आजकाल आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर भारताच्या भागांमधील उष्माघाताने मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा सुमारे २००० वर पोहचला आहे हे वाचतो. मन सुन्न होते की काही पर्याय नाही का , सामान्य माणसांची ससेहोलपट थांबविण्याचा सामान्य हातावर पोट भरणार्‍या गरीब माणसाला ह्या कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी Air-condition , Cooler, वा पंखे अशा खिशाला न परवडणार्‍या महागड्या सुखसोयींचा लाभ घेता नसेल येत पण निसर्गाच्या ह्या छत्रछायेत तो नक्कीच विसावू शकतो आणि ते ही विनामूल्य ! काही अंशी जंगलतोडीमुळे मानवाने जागतिक तापमान वाढीचे (ग्लोबल वॉर्मिंगचे) संकट स्वत:च ओढावून घेतले आहे. फक्त उष्माघातच नव्हे तर दुष्काळ, पूर, सुनामी, भूकंप अशा बहुतांशी सर्वच नैसगिक आपत्तींना तोंड देण्यासाठी झाडे लावणे , जोपासणे हा अत्यल्प खर्चाचा, सोपा , प्रभावी उपाय आहे! म्हणजेच वटवृक्ष, पिंपळ अशा वृक्षांच्या संगोपनामुळे आपण एक प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाला हातभारच लावत असतो. पण त्यासाठी वटवृक्षांची जपणूक तर व्हायला हवी .
अशा या सर्वतोपरी परोपकारी वटवृक्षाचे महत्त्व आमच्या संस्कृतीसंरक्षक पूर्वजांनी वटपौर्णिमाया दिनाच्या निमित्ताने समाजापुढे आणून प्रस्थापित केले आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेलाच या ज्ञानी लोकांनी वटपौर्णिमाहे नामाभिधान दिले असावे असे वाटते.
पूर्वी विवाहीत स्त्रिया ह्या वडाच्या पारावर जाऊन पूजा करायच्या, पण आजकाल शहरातील सिमेंटच्या जंगलात झाडांचीच बेसुमार कत्तल झाली आणि त्यातून वडाच्या झाडाचा अवाढव्य पसारा पाहता तर वडाची झाडेच हद्दपार होऊ घातली आहे. आता वडाचे पूजन तर वटपौर्णिमेला करायला हवे सौभाग्यासाठी, मग पर्यायी उपाय म्हणून वडाच्या झाडाच्या फांद्या तोडणे सुरु झाले. त्यामुळेच वडाच्या झाडाच्या पूजनाचा पवित्र हेतूच बाधित झाला आहे आणि वाटते जणू यांत्रिक कवायत उरली आहे. जर "पावित्र्य हेच प्रमाण " हा मूळ गाभाच आपण विसरलो तर हे वट्पूजन केवळ एक कर्मकांड ठरेल असे वाटते. प्रेमापोटी केलेली पूजा जे फळ देईल ती मी ही पूजा केली नाही तर माझ्या पतीला धोका होऊ शकतो ह्या भीतीपोटी काय वाटेल ते करून मला ही पूजा करायलाच हवी ह्या भीती पोटी केली तर ती तोडलेल्या वडाची फांदीची पूजा खरा आनंद देईल का मला ? ह्याचा विचार जरा तरी आपण करायला हवा , नाही का बरे?
आणि म्हणूनच असे वाटते की वटपौर्णिमा हा सण सवाष्णीसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. कारण पर्यावरणप्रेमींना नंतरचे दोन/तीन दिवस तरी रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे विदारक झालेले रूप पाहवे लागते, जसे १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवसानंतर वा २६ जानेवारी प्रजासताक दिनानंतर मातीत पडलेले फाटलेले झेंडे आपला राष्ट्रीय ध्वजाचा अपमान पाहून होते अगदी तसेच. कारण वटवृक्ष म्हणजेच वडाचे झाड हा आपला भारतीयांचा राष्ट्रीय वृक्ष आहे. ज्याचा गौरव करून आदर द्यायचा त्यालाच असे पायदळी तुडवताना मनाला किती असह्य यातनाच होतात, नाही का
जणू वाटते की अनादी अनंत कालापासून आपल्या लेकी-सुनांना, नातींना अखंड सौभाग्याचे वरदान देणारा हाच "आधारवड" आज याचना करीत आहे स्वसंरक्षणाची - माझ्या पोरींनो आता यमाच्या तावडीतून तुम्हीच मला जीवनदान द्या नाहीतर आपली भेट फक्त Computer, Mobile , laptop वर चित्रातच होऊ शकेल नजीकच्या काही काळातच....
आपल्या वंदनीय जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ही अभंगातून वृक्षांचे महत्त्व सांगताना त्यांना आपले सोयरेच म्हटले आहे –
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीहि सुस्वरे आळविती ।
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।
आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे तेथे मन क्रीडा करी ।
कथा कमंडलू परवडी विस्तार । करोनी प्रकार सेवू रुची ।
तुका म्हणे होय मानसी संवाद । आपुलाची वाद आपणासी ।।
 
भगवान गौतम बुध्द, महावीर अशा थोर महात्म्यांनी आणि हजारो ऋषी- महर्षींनी तसेच अनेक संत महात्म्यांनी वटवृक्षाखाली बसून तपश्र्चर्या केली.म्हणून या वृक्षाला पवित्र वृक्ष मानले जाते. तसेच यज्ञात वापरल्या जाणार्‍या समिधा ह्या वृक्षाच्या असतात म्हणून ह्याला यज्ञवृक्ष असेही म्हणतात.  
भगवान बुध्द त्यांना दिव्य साक्षात्कार  होऊन ज्ञान प्राप्त झाल्यावर ७ दिवस ह्याच वटवृक्षाच्या  खाली  ध्यानावस्थेत चिदानं दाच्या दिव्य अनुभूतीत न्हावून निघाले होते. त्यामुळे बुध्द संप्रदायात वटवृक्षाला ७ बोधीसत्व वृक्षांपैकी १ म्हणून गणले जाते.   मग अशा आपल्या आप्त असणार्‍या सगे-सोयरे ह्यांना मान द्यायलाच हवा, पूजन वडाच्या झाडाचे आपण करू याच , पण वेगळ्या प्रकारे! वडाची झाडे , फांद्या न तोडता त्यांची वाढ करून , जोपासना करून...
जसे आपण कुटूंबातील ज्येष्ठ आणि सदैव आधार देणार्‍या व्यक्तीला "आधारवड" म्हणून गौरवितो तसेच भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे. भारतात कुठेही गेलात तरी देवळाजवळ, गावात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला वटवृक्ष जपण्याची परंपरा दिसून येईल. तो देखील कुटुंबप्रमुखासारखा अटळ, अचल उभा राहून संसाराला जीवन, संरक्षण व सुविधा देण्याचे कर्तव्य बजावत असतो. गावातील कित्येक पिढ्या, लहानथोर त्याच्या अंगावर खेळून मोठी होतात. गावोगावी वडाच्या पारावर बसून आपली सुखदु:खे वाटण्यासाठी त्याच्या विशाल सावलीचा आधार घेत आयुष्याची संध्याकाळ घालवणारे कितीतरी जीव आहेत; ह्याच वडाच्या पाराभोवती स्तोत्र, मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालण्याचीही प्रथा पूर्वापार चालत आली आहे. अजूनही बर्‍याच गांवामध्ये जागोजागी हा धीर गंभीर वटवृक्ष उभा असतो. मायेची सावली देण्या जणू तो तत्पर उभा ठाकला असतो.
आम्ही लोक वटपोपौर्णिमेला वडाच्या झाडाच्या पूजेसाठीच फांद्या तोडून आदरणीय , पूज्यनीय अशा त्याच वडाच्या झाडांना इजा करतोम्हणजे आपल्यात आपल्या शास्त्राची , संस्कृतीची खरी जाण नाही आणि पर्यावरणाची जाणीव नाही , आपल्या कडे आपल्या पूर्वजांच्या विषयी आदरभाव , कृतज्ञता नाही आणि भूमातेचिषयी अंबज्ञ भाव नाही असे काही अंशी तरी सिद्ध करतो असे वाटते.
अंबा म्हणजे माता आणि अंबज्ञता म्हणजे अंबेविषयी , मातेविषयी कृतज्ञ भाव ! लक्ष्मी मातेची भूदेवी आणि श्रीदेवी अशी २ रुपे मानली जातात. लक्ष्मीपूजनाला दीपावलीला आपण सारे ह्या श्रीदेवीची पूजा करतो. वटपौर्णिमेच्या पावन दिवशी आपण ह्या भूमातेची अंबज्ञता मानण्यासाठी वटवृक्षाचे पूजन जरूर करू याच ! आज आपण वटवृक्षाचा अनन्यसाधारण महिमा जाणलातेव्हा त्याच वृक्षाच्या फांद्या तोडून त्याच्याच मुळावर घाव घालण्याचे हे कृत्य कोणी करू नये अशी कळकळीची विनंती करावीशी वाटते.
महाभारतात एका प्रसंगात द्रौपदी अत्यंत निराश होऊन श्रीकृष्णाचा धावा करत असते, तेव्हा तिला श्रीकृष्ण म्हणाले निराश होऊ नकोस वट्वृक्षासारखी हो !
वटवृक्षाला मुळासकट कापून टाकले आणि त्याची एखादी फांदी जरी दगडावर पडली तरी तिला मुळे फुटतात आणि त्यातून मोठा वटवृक्ष उभा राहतो. त्या वटवृक्षासारखी कोणताही आघात  खंबीर पणे पचवून, न डगमगता नव्या जोमाने, नव्या ताकदीने , नव्या सळसळ्त्या चैतन्याने  पुन्हा उभी राहा असा  बहुधा उपदेश केला असावा ज्यात  ह्या वडाच्या झाडाचे महात्म्य साक्षात भगवंताने गायिले आहे. म्हणून आजच्या घडीला गावांगावांमध्ये, शहरांत , राज्यात वडाच्या झाडाचे संवर्धन आणि लागवड करणे वटपौर्णिमेच्या दिनी हाच संकल्प कालानुरुप उचित ठरेल.  
"व्यक्ती तितक्या प्रकृती " - बाकी प्रत्येकाला आपले व्यक्तीस्वातंत्र्य आणि कर्मस्वातंत्र्य आहेच मुळी, त्याचा वापर कसा करावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
एखाद्या वटवृक्षाची खत-पाणी घालून जोपासना करू किंवा कमीत कमी एखादया इतर वृक्षाला संरक्षक लावता आले तर लावावे. हीसुद्धा वृक्षाची एकाप्रकारे पूजाच आहे. खरोखर वटवृक्षाचा महिमा जाणून फक्त महिलांनीच नव्हे तर सर्व मानवांनी या "आधारवडाचा " सन्मान करीत याची सेवा अंशत: तरी वटपौर्णिमेचे औचित्य साधून करायलाच हवी
, जे खर्‍या अर्थाने वटवृक्षाचे उचित पूजन घडेल आणि जे माझ्या भूमातेला अधिक प्रिय असेल असे वाटते.

 
All Copyrights Reserved with
Shubham Kenekar (IFS)
shubhamkenekarifs70@gmail.com
+918668281474
+917276744080

 


Comments

Popular posts from this blog

MANU AWATI - YOUNG MAN AND THE SEA

Did a Divine Monkey Unlocked the gates of the Babri...?